रिलायंस ज्वेल्स दरोड्यातील आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
तीन महिन्यांपूर्वी शहरातील मार्केट यार्डजवळ असलेल्या ‘रिलायन्स ज्वेल्स’ या सराफी दुकानावर भरदिवसा घातलेल्या दरोडाप्रकरणी अंकुरप्रताप सिंग याची कसुन चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात एकुण नऊ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांची छायाचित्रेही मिळाली आहेत. लवकरच अन्य संशयितांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री. फुलारी सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, रिलायन्स ज्वेल्स दुकानावर नियोजनबद्धरीत्या टाकण्यात आलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून कोट्यवधींचे दागिने घेऊन चारचाकीतून पलायन केले होते. पोलिसांची बिहार, ओडिसा येथे पथके पाठवण्यात आली.
त्यानंतर गणेश उद्धव बद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोकसिंग राणा (बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (बिहार) या चार मुख्य संशयितांची नावे जाहीर करण्यात आली. ओडिसा येथे अशाच पद्धतीने पुन्हा रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला. तेथे तो डाव फसल्याने तिघे पोलिसांना सापडले. त्यात अंकुरप्रताप हा देखील होता. तो सांगलीतील दरोड्यात वाहनचालकाच्या भूमिकेत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
सांगलीतील दरोड्याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह एलसीबीची पथके तैनात आहेत. ओडिसा येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. तो इलेक्ट्रीशन असून सीसीटीव्हीच्या वायर त्याने तोडून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अन्य साथीदारांची नावेही पुढे आली आहेत. याच्यासह एकुण नऊ जणांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असेही फुलारी यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.