उपोषण सोडा म्हणतात... पण ते सोडवायला कुणी येतच नाही!
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
जालना : खरा पंचनामा
आम्ही उपोषण सोडायला तयार आहे, पण ते सोडवायला कुणी येतच नाहीत. आरक्षणाचा जसा खेळखंडोबा मांडलाय त्यातलाच हा प्रकार असल्याचं दिसतंय अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
एखादा मित्र दुसऱ्या मित्राला जसं म्हणतो की ये. नुसतं ये म्हणतो. तसं हे म्हणतात की आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ द्या. पण ती वेळ नेमकी कशासाठी पाहिजे हे मात्र सांगत नाहीत असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जालना दौरा रद्द केल्यानंतर मनोज जरांगे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची काहीच माहिती नव्हती, अधिकृत पत्रही नव्हतं. संध्याकाळी 6 वाजता अर्जुन खोतकरांनी सांगितलं होतं की ते मुख्यमंत्र्यांना घेऊन येतील. बातम्यांमधूनही सकाळपासून हीच माहिती समोर येत होती. पण आता त्यांचा दौराही रद्द झाला, याचीही अधिकृत काहीच माहिती नाही.
उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही. हे आरक्षणाप्रमाणेच झालं, देतो म्हणतात पण देत नाहीत. सरकारच्या दोन अटी होत्या. एक महिना वेळ द्या आणि आमरण उपोषण सोडा असं सांगण्यात आलं. पण सर्वांनी सांगितलं की आरक्षणासाठी 40 दिवस द्या, तेही दिलं. पण मंत्री आता आमच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. मी शेवटी म्हटलं की आमरण उपोषण सोडतो पण साखळी उपोषण सोडणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण सोडणार नाही.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नियोजित जालना दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जालन्यात जाऊ नये असं पत्र आल्यानं हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.