चेन स्नॅचिंग करणाऱ्यास अटक, ७० हजारांचे दागिने जप्त
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर शहर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे ७० हजारांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
दीपक नागेश कुंभार (वय २३, रा. कोरेगाव, ता. वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक खास पथक तयार केले होते. पथक गस्तीवर असताना नागाव-आष्टा रस्त्यावर एक तरूण संशयास्पदरित्या चोरीचा माल घेऊन जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने या परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून दीपक कुंभार आल्यानंतर त्याला पथकाने अडवले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने इस्लामपूर-बहे रस्त्यावर एका वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, अरूण पाटील, सचिन धोत्रे, प्रकाश पाटील, अभिजित ठाणेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.