दुधोंडीत साडेआठ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघांना अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील कालव्याजवळ असलेल्या गोठ्यात अवैधरित्या साठा केलेला तब्बल साडेआठ लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
शिवाजी जाधव (वय ४८), रविंद्र यशवंत अरबुणे (वय ५७, दोघेही रा. दुधोंडी), सुहास हिरासा झाड (वय ६३, रा. कबनूर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू, गांजा तसेच नशेच्या पदार्थांची विक्री होऊ नये. त्यावर कारवाईसाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाला दुधोंडी येथील कालव्याजवळ एका गोठ्यात अवैध दारू साठा असल्याची माहिती मिळाली.
पथकाने त्या गोठ्यावर छापा टाकून झडती घेतल्यानंतर तेथे विदेशी दारूचे ११२ बॉक्स आढळून आले. त्याबाबत जाधव यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अरबुणे आणि झाड यांच्याकडून ते खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच अरबुणे, झाड यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती दारू हुबळी येथील संदीप बद्दी याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर साडेआठ लाखांचा दारूसाठा जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यावर कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अमर नरळे, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, विक्रम खोत, प्रकाश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.