महिला पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस चौकीच्या दारातच हल्ला!
पुणे : खरा पंचनामा
विनयभंगाची तक्रार मागे घेतल्यानंतरही त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार देण्यासाठी सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीत महिला पोलीस अधिकारी गेल्या होत्या. तेव्हा या चौकीच्या दारातच त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी निलेश आंद्रेस भालेराव (रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याला अटक केली आहे. याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश भालेराव हा मुंबईत फोर्स वन येथे नेमणूकीला आहे. फिर्यादी या एमआयए येथे २०१८ मध्ये नेमणुकीला असताना आरोपी निलेश हा फोर्स वनचे ट्रेनिंगसाठी आला होता. यावेळी त्याने फिर्यादी यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करुन विनयभंग केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीच्या घरच्यांच्या विनंतीवरुन फिर्यादी यांनी तो गुन्हा मागे घेतला होता. गुन्हा मागे घेतल्यानंतरही निलेश भालेराव हा त्यांना वारंवार मोबाईलवर फोन करुन त्रास देत होता. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी या महिला अधिकारी अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतल्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास निघाल्या.
तेव्हा निलेश तेथे आला. त्याने हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला, असे मोठ्या ने बोलून फिर्यादी या चौकीच्या बाहेर जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. पायऱ्यांवर दरवाजा लगत ढकलून त्यांचा विनयभंग केला. त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पकडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.