गणपतीच्या डोळ्यातून अश्रू, भाविकांची गर्दी!
सांगली : खरा पंचनामा
सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या दरम्यान गणेश मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची बातमी पसरली व गावात भाविकांनी एकच गर्दी केली. हा प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथे शनिवारी सकाळी घडला असून वार्ता पसरताच भाविकांची एकच गर्दी उसळली.
शिराळा तालुक्यातील चिंचोली गावातील बापू जाधव यांच्या घरी परंपरेने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षीही श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रथेप्रमाणे करण्यात आली. नित्याप्रमाणे पूजा करत असताना डोळ्यात चमक दिसली. ही चमक म्हणजे गणेशाचे अश्रूच असल्याचा समज झाला. काही भाविकांनी कापसाच्या बोळ्याने डोळे टिपून पाहण्याचा प्रयत्नही केला. आजूबाजूला जमलेल्या लोकांनीही याला दुजोरा दिला. यामुळे गणपतीच्या डोळ्यात अश्रू आल्याची अफवा वाऱ्याच्या गतीने पसरली. यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी धावले. महिलांनीही मोठी गर्दी केली.
मात्र हा प्रकार प्रकाशाच्या परार्तनाचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र श्रध्दाळू हे मान्य करायला राजी नव्हते. हा प्रकार अंधश्रध्देचा असून वैज्ञानिक तथ्य लक्षात घेता असे घडणे अशक्य आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याविरुध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसचे कार्यकर्ते राहूल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस. के. माने आदींनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.