पोलीस भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, 10 उमेदवारांवर गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या दहा उमेदवांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिल्याचे भासवून फसवणूक केली आहे.
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक युवराज मारुती मोहिते यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी उमेदवार सोमीनाथ सुधाकर कंटाळे (रा. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड), अजय बभ्रुवान जरक (रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडवे (रा. सोमनाथनगर, कोंढवा बुद्रुक), दिनेश अर्जुन कांबळे (रा. ब्रह्मगाव, जि. बीड), राजेश रमेश धुळे (रा. नांदेड), अमोल विठ्ठल गरके (रा. ता. भोकर, जि. नांदेड), धृपद प्रल्हाद खारोडे (रा. वाकड, ता. भोकर, जि. नांदेड), गोविंद भक्तराज मिटके (रा. शिवणगाव, ता. उमरी, जि. नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे (रा. ता. केज. जि. बीड), हेमंत विठ्ठल निकम ( रा. वाघोली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रिया 2021 मध्ये राबवण्यात आली होती. भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी सादर केलेल्या शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलावले होते. भरती प्रक्रियेत आरक्षणनिहाय कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडे सोपवली होती.
सोमीनाथ कांटाळेसह 10 उमेदवारांनी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात बीड येथील प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेकडून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी उमेदवारांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.
आरोपींनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करुन त्यामध्ये खाडाखोड करुन ते पोलीस भरतीसाठी सादर केले. आरोपींनी 2009 ते 2015 दरम्यान आधीच प्रमाणपत्र काढून ठेवले होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.