एसटी बसवरील सरकारी जाहिरातींना काळे फासले!
मराठा आंदोलक आक्रमक
कोल्हापूर : खरा पंचनामा
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी एसटी बसवरील सरकारी जाहिरातींसह पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना लाल-काळे फासून सरकारचा निषेध नोंदवला. मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस फोडल्या आहेत. आरक्षणासाठी उग्र आंदोलन केले जात आहे. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटत आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाचा लढा आरपारच्या निर्धाराने यशस्वी होण्यासाठी रविवार सकाळपासून मराठा समाजाने नियोजित बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
विशेषतः कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरून धावणाऱ्या एसटीच्या बस गाड्यांवरील सरकारी जाहिरातींना आंदोलकांनी लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोंना लाल आणि काळे रंग फासले.
पक्ष संघटना विरहित या साखळी उपोषणाला परिसरातील सामाजिक संघटना, व्यापारी असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बांबवडे पोलीस दुरक्षेत्राच्या शेजारी सकल मराठा समाजाचे तरुण साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी 'हक्काचे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही', अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तालुक्यातील मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.