इस्लामपुरात दुचाकी चोरट्यास अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथे पार्किंग केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून इस्लामपूर येथील दोन, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी आणि गांधीनगर येथील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आणून तीन लाखांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
गणेश महादेव कोरे (वय २३, रा. उरूण-इस्लामपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कामेरी येथील संतोष पाटील यांची दुचाकी मंगळवारी इस्लामपूर येथे उभी केली होती. अज्ञाताने ती चोरून नेली. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्री. हारूगडे यांनी दुचाकी चोरट्यांना तातडीने पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला गणेश कोरे याने दुचाकी चोरल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने ती चोरल्याची कबुली दिली. शिवाय शाहुवाडी, गांधीनगर येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, दीपक ठोंबरे, सजन पाटील, गणेश वाघ, जमीर मुलाणी, सतीश खोत, अभिजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.