स्टेजवर येताच जरांगे पाटलांना अश्रू अनावर!
जालना : खरा पंचनामा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा कालावधी दिला होता. या कालावधीला आज महिना पूर्ण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आज ते विराट सभा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील आजच्या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित आहे. मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन झालं आहे. समोर असलेली गर्दी बघून मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. स्टेजवर पोहोचताच त्यांनी आपल्या आईचा आर्शीवाद घेतला.
दरम्यान मनोज जरांगे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव सभास्थळी दाखल झाले आहेत. आलेल्या गर्दीला सभेनंतर शांततेत बाहेर काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सभेला शांततेत संबोधित करा अशी विनंती त्यांनी जरांगे पाटील यांना केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र मराठ्यांना चाळीस दिवसांच्या आत आरक्षण द्यावं अशी अट त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातली होती. उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा घेतल्या. आज जरांगे यांनी दिलेल्या कालावधीला एक महिना पूर्ण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची विराट सभा होणार आहे. या सभेला मराठा बांधवांनी गर्दी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.