साखरसम्राट, दूधसम्राट यांना झुकवल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी
सांगली : खरा पंचनामा
ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये आणि दुधाला प्रतिलिटर ६० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. यासाठी साखर सम्राटांना आणि दूध सम्राटांना झुकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. सांगलीत गुरुवारी जन आक्रोश पदयात्रेवेळी ते बोलत होते.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रीफळ वाढवून पदयात्रेचा प्रारंभ झाला. तेथून गणपती मंदिरासमोर साकडे घालण्यात आले. तेथून पदयात्रा मिरजेकडे रवाना झाली. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्या कष्टावर साखरसम्राटांचा चैनी करु देणार नाही. यंदाच्या साखर हंगामात वजन काटे ऑनलाईन केल्याशिवाय कारखान्याला ऊस घालणार नाही.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, पण त्यानुसार दर देण्यास कारखानदार तयार नाहीत. पण स्वाभिमानी संघटना कारखानदारांकडून दर मिळविल्याशिवाय राहणार नाही. पदयात्रेत संदीप राजोबा, भरत चौगुले, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, बाळासाहेब लिंबीकाई, श्रीधर उदगावे आदी सहभागी झाले.
ऊस तोडीसाठी पैशांची वसुली थांबवा, साखर उताऱ्यातील चोरी थांबवा, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करा, त्यांच्या खप वाढीसाठी जाहिराती सुरू करा, दलालाची नोंदणी करुन अनामत घ्या, दुधाला हमीभाव लागू करा, डाळिंब आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग सुरू करा, आदी मागण्या स्वाभिमानीने केल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.