Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार गटाला लोकसभेच्या तीनच जागा?

अजित पवार गटाला लोकसभेच्या तीनच जागा? 



मुंबई : खरा पंचनामा

भाजपने २३ आणि शिवसेनेने (शिंदे गट) लोकसभेच्या २२ जागांवर आपला दावा सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्षाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मात्र, पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी महायुतीच्या लोकसभा जागावाटपाचे अंतिम सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना ( शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांनी एकत्रित महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. शिवसेना ( शिंदे गट) आणि भाजप यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) यासंदर्भात सोमवारी सर्व मंत्री आणि खासदार यांची बैठक घेऊन मागील लोकसभा निवडणुकीत लढविलेल्या सर्व २२ जागांवर दावा केला आहे. तशा सूचनाही सर्व मंत्री आणि खासदारांना दिल्या आहेत.

भाजपनेही मागील निवडणुकीत लढविलेल्या २३ जागांवर आपला हक्क सांगितला आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असल्याने उरलेल्या ३ जागाच राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार गट) मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेनेने २२ जागांवर दावा केल्याबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, "प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मागण्याचा हक्क आहे. प्रत्येक पक्ष जास्त जागांसाठी प्रयत्न करतो. मात्र जागा वाटपाचे सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येईल. त्यामुळे आता कोणी काय दावा केला याला फार महत्त्व नाही." "महाराष्ट्रात केवळ ४८ जागा आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच जागा मागाव्यात. नाहीतर ९० जागा असल्याप्रमाणे जागांची मागणी केली जाईल," अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.