दूध वाहतूक वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी!
दोन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त, सातारा एक्साईजची कारवाई
सातारा : खरा पंचनामा
कराड-चिपळूण रस्त्यावरील गोषाटवाडी येथे दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साताऱ्याच्या राज्य उत्पादन शुल्कचा अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांनी दिली.
गोरखनाथ बाबुराव पवार (रा. बेलावडे खुर्द, ता. पाटण, जि. सातारा), प्रदीप कृष्णात सलते (रा. सलते, ता. पाटण, जि. सातारा), दिनेश दगडू कदम (रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोवा-मुंबई महामार्गावरुन दूध वाहतुकीच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती अधीक्षक शेडगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक कराड-चिपळूण मार्गावर गस्त घालत होते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे दूध वाहतूक करणारे वाहन आल्यानंतर पथकाने ते थांबवले. त्या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे २५ बॉक्स आढळले. त्याशिवाय या दूध वाहतुकीच्या वाहनासोबत असणारी एक कारही पथकाने जप्त केली आहे. पथकाने याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून गोवा बनावटीची दारू, दोन वाहने असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, साताऱ्याच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोक नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे, राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र अवघडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.