आता सांगलीतही लवकरच धावणार ई-बस!
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्यावतीने लवकरच शहरात ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेचा समावेश पीएम ई- बस सेवेत झाला असून, याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेने शनिवारी (दि. ७) महापालिका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केल्याची माहिती मनपा आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
आयुक्त पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची स्वतःची परिवहन यंत्रणा आहे. सांगली शहरात देखील सर्व उपनगर आणि प्रमुख भागात बस सेवा सुरू केल्यास किती फायदा होईल. त्यासाठीची जागा, चार्जिंग स्टेशन, मार्ग याबाबत प्राथमिक तयारी झालेली आहे. सांगली महापालिका क्षेत्र बघता पहिल्या टप्प्यात 50 बसेस घेण्यात येणार आहेत. यामध्ये लांब पल्ल्यासाठी मोठ्या तर शहरात मिनी बस घेण्याचे नियोजन आहे. हा उपक्रम हाती घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना समजून घेतल्या जाणार आहेत.
शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता महापालिका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले असून, यामध्ये सूचना देता येणार आहेत. यामध्ये एसटी महामंडळ, आरटीओ, वाहतूक पोलीस, महावितरण अशा यंत्रणांचाही समावेश असणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.