पत्नीचा खून करणाऱ्या पतीस विजापूरमधून अटक
सांगली : खरा पंचनामा
शहरातील वानलेसवाडी येथे चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा चाकूने सपासप वार करून खून करणाऱ्या पतीस अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री खुनाची घटना घडली होती. खून केल्यानंतर संशयित पसार झाला होता. शनिवारी विश्रामबाग पोलिसांनी त्याला विजापूर (कर्नाटक) येथून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली.
सिद्धाप्पा नागाप्पा कट्टीमणी (वय ३०, रा. कक्केरी, जि. यादगीर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिद्धाप्पा याचा शिल्पा हिच्याशी विवाह झाला होता. कट्टीमणी कुटुंब मोल मजुरीसाठी सांगलीत आले होते. संशयित सिद्धाप्पा हा व्यसनी होती. तसेच तो सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गुरुवारी रात्री मृत शिल्पा तिच्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी सिद्धाप्पा तेथे गेला.
तेथे सिद्धाप्पा आणि शिल्पा यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर सिद्धाप्पा याने शिल्पावर चाकूने सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सिद्धाप्पा तेथून पसार झाला होता. याप्रकरणी शिल्पाची आई मंजुळा हिने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सिद्धाप्पावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी संशयिताला तातडीने पकडण्याचे आदेश विश्रामबाग पोलिसांना दिले होते.
विश्रामबाग पोलिसांना सिद्धाप्पा विजापूर येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्रभारी पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक तानाजी कुंभार, संदीप वाघमारे, उपनिरीक्षक अफरोज पठाण, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संदीप माने, सचिन घोदे, शक्ती गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.