पाण्याच्या टाक्या चोरणाऱ्या तरूणाला अटक
चार लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
विटा शहरातून पाण्याच्या टाक्या चोरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक छोटा ट्रक, तीन टाक्या असा ४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
पृथ्वीराज बाळकृष्ण चव्हाण (वय २५, रा. जुना वासुंबे रस्ता, विटा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विट्यातील विवेकानंदनगर येथून वेगवेगळ्या आकाराच्या तीन पाण्याच्या टाक्या चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर निरीक्षक श्री. डोके यांनी यातील चोरट्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते.
पथक विटा शहरात गस्त घालत असताना लेंगरे रस्त्यावर एक तरूण छोट्या ट्रकमध्ये पाण्याच्या टाक्या भरून थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पाण्याच्या टाक्यांबाबत कसून चौकशी केल्यानंतर विट्यातील बोंडरे वस्ती येथून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून छोटा ट्रक (क्र. एमएच १० सीआर २४५५), तीन टाक्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.