एमआयडीसीत घरफोडी करणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक
६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील कार्वे येथील एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार, स्क्रॅप असा ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
आकाश विजेश गोसावी (वय २५), रविंद्र तुकाराम गोसावी (वय ३३), विनोद रामप्पा गोसावी (वय ३०), अनिल रामप्पा गोसावी (वय २५, सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कार्वे येथील एमआयडीसीतील गोदामातून दीड लाखांच्या बॅगा चोरल्याची रोहीत जाधव यांनी फिर्याद दिली होती. या चोरीचा तपास तातडीने करून गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते.
पथकाला ही चोरी संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून विटा पोलिस ठाण्यातील तीन तर कडेगाव पोलिस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत चव्हाण, अनिल जाधव, उपनिरीक्षक विशाल येळेकर, सागर गायकवाड, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.