Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंतरावांचे इचलकरंजी दौरे वाढले! सुपुत्र प्रतीक यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी संपर्क वाढवला

जयंतरावांचे इचलकरंजी दौरे वाढले!
सुपुत्र प्रतीक यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी संपर्क वाढवला



अभिजित बसुगडे
इचलकरंजी : खरा पंचनामा


राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केल्याचे दिसून येत आहे. विविध कारणास्तव त्यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी इचलकरंजीत झालेल्या रावण दहन कार्यक्रमाला त्यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचे आव्हान असल्याचे चित्र आहे. राजू शेट्टीनी कोणत्याही पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीतून जयंतरावांचे सुपूत्र प्रतीक यांना उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यामुळेच जयंतराव आतापासूनच इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात सक्रीय झाल्याची चर्चा आहे. 

देशातील पाच राज्यातील विधानसभा सध्या सुरू आहेत. याबरोबरच सवर्च राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. बहुतांशी पक्षांनी उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. पक्षांच्या बैठकांमध्येही इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली जात आहेत. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांना उमेदवारी देण्याची मागणीही इचलकरंजी मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. याला जयंतरावांची मूक संमती असावी असे आता वाटत आहेत. त्यामुळेच की काय जयंतरावांचे इचलकरंजी शहरासह लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. सुपूत्र प्रतीक यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी संपर्क वाढवल्याची चर्चा आहे. 

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे शिवसेनेला ही जागा गेल्यास तेथे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे उमेदवार असतील. त्याशिवाय भाजपमधूनही काहीजण इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यामध्ये विशेषतः राहुल आवाडे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची संख्याही अत्यल्प असल्याने शिंदे गट किंवा भाजपला इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वतर्वली जात आहे. 

जयंत पाटील यांच्या इचलकरंजी शहर आणि लोकसभा मतदारसंघातील वाढते दौरे आणि संपर्क यामुळे प्रतीक जयंत पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेस तसेच ठाकरे गटाकडे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तगडा उमेदवार नसल्याने इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.