व्यसनाची माहिती घरच्यांना सांगितल्याने घेतला महिलेचा जीव!
संशयिताला अटक, कोल्हापूर एलसीबी, राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापुरातील सुभाषनगर येथील महिलेचा खून करण्यात आला होता. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान दारू पिताना पाहिल्याचे घरातील लोकांना सांगितल्याचा राग आल्याने एका तरूणाने त्या महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संशयित तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर एलसीबी आणि राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
प्रतिक विनायक गुरुले (वय २२, रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर, कोल्हापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. लक्ष्मी विलास क्षिरसागर (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विलास क्षिरसागर यांनी फिर्याद दिली आहे. मृत लक्ष्मी यांनी तीन आठवड्यांपूर्वी प्रतिक याला दारू पिताना पाहिले होते. त्यावेळी त्यांनी ही बाब प्रतिक याच्या घरच्यांना सांगितली होती. त्याचा राग प्रतिकच्या मनात होता.
शनिवारी रात्री लक्ष्मी या नातीला घेऊन दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. नातीला कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडून येताना त्यांनी सरनाईक मळ्यातील चर्चच्या भिंतीजवळ प्रतिक दारू पित असल्याचे पाहिले. त्यावेळी त्या तेथे गेल्या. तू पुन्हा येथे दारू पित बसला आहेस, मी तुझ्या घरी सांगते असे म्हणाल्या. यापूर्वीही त्यांनी असेच घरी सांगितल्याचा राग त्याला होताच. त्याच रागातून त्याने लक्ष्मी यांना भिंतीवर ढकलले. त्या खाली पडल्यानंतर प्रतिकने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्या जागीच गतप्राण झाल्या.
रात्री उशीरापर्यंत त्या घरी न परतल्याने घरच्यांनी त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. रविवारी सकाळी लक्ष्मी यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती तसेच खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रतिक याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.
कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे, एलसीबीचे निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, रामचंद्र कोळी, अमर आडुळकर, अमित सर्जे, सुरेश पाटील, ओंकार परब, प्रवीण पाटील, समीर शेख, युक्ती ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.