Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साखर कारखानदारांच्या मागे आयकरचा ससेमिरा लावणार आक्रोश पदयात्रेत राजू शेट्टी यांचा इशारा

साखर कारखानदारांच्या मागे आयकरचा ससेमिरा लावणार
आक्रोश पदयात्रेत राजू शेट्टी यांचा इशारा



कोल्हापूर : खरा पंचनामा
             
ऊसाच्या साखर उताऱ्यात कधीकाळी परस्परांशी स्पर्धा करणारे साखर कारखाने अलीकडे उताऱ्यात (रिकव्हरी) चोरी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. नैसर्गिक उताऱ्यानुसार उत्पादित होणाऱ्या साखरेची दप्तरी नोंद न दाखवता सर्रास कारखान्यांनी हा लुटीचा उद्योग राजरोसपणे सुरू ठेवला आहे. असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. सर्वच साखर कारखान्यांचे हिशेब माझ्याकडे उपलब्ध आहेत. आयकर विभागाकडे तक्रार करून चौकशीचा ससेमिरा मागे लावणार असल्याचा इशाराही शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला आहे. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे ते बोलत होते.

शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा वाढीव प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी सुरू केलेली ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा बुधवारी रात्री शाहूवाडी (थेरगाव) तालुक्यात आली. ही पदयात्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता बांबवडे येथे दाखल झाली. यावेळी ग्रामपंचायत, व्यापारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

शेट्टी म्हणाले, यंदाचा ऊस गळीत हंगाम फेब्रुवारी महिन्याअखेरीस संपणार आहे. त्यामुळे ऊसासाठी कारखान्यांची स्पर्धा लागणार आहे. परंतु 'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही' या तात्विक न्यायाप्रमाणे मागील हिशोबातील ४०० रुपये दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देऊ नका. प्रसंगी कारखान्यांची साखर वाहने आडवा, वजनकाट्यावर निर्भीडपणे लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

यावेळी भाई भारत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश म्हाऊटकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले. गणेश पाणीपुरवठा संस्था, बँक ऑफ महाराष्ट्र, व्यापारी संघटना आदींनी राजू शेट्टी यांना भेटून पाठिंबा व्यक्त केला.

पदयात्रेत वसंत पाटील, पद्मसिंह पाटील, रायसिंग पाटील, संतोष पाटील, राम लाड, काका पाटील, अजित साळुंखे, अवधूत जानकर आदींसह परिसरातील शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.