नालसाबचा मामे भाऊ मुनीर मुल्लाला अटक
सचिन डोंगरेसह हल्लेखोरांना मदत केल्याचे स्पष्ट; पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, वादग्रस्त बाबा ग्रुपचा प्रमुख नालसाब मुल्ला याच्या खूनप्रकरणी त्याचा मामे भाऊ मुनीर मुल्ला याला अटक करण्यात आली आहे. दि. ६ नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खुनातील संशयितांवर मोका अंतगर्त कारवाई झाल्यानंतर याच्या तपासाला गती आली आहेत. त्यातूनच नालसाब खुनातील संशयितांशी मुनीर संपर्क साधत होता तसेच सचिन डोंगरे याच्याही संपर्क साधत होता हे स्पष्ट झाले. शिवाय नालसाबचा खून झाल्यापासून तो पसार झाला होता. त्याचा या खुनात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक केल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
मुनीर अल्लाकबीर मुल्ला (वय ३२, रा. मिरज, औद्योगिक वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नालसाबच्या खुनातील मुख्य सुत्रधार, सराईत गुंड सचिन डोंगरे याच्यासह संशयितांना मदत केल्याने त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, आता खुनप्रकरणी बारावे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नालसाब मुल्ला याचा खून कळंब्यात जेरबंद असलेल्या जॉय ग्रुपचा प्रमुख सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. एकेकाळी नालसाबचा साथीदार असलेला डोंगरे याच्यावर मोक्कातंर्गत २०१९ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यातून जामिन मिळवण्यासाठी नालसाब मदत करत नसल्याच्या रागातून डोंगरे याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली होती.
या खूनप्रकरणी पोलिसांनी गुंड सचिन विजय डोंगरे, स्वप्नील संतोष मलमे (रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), सनी सुनील कुरणे (शाहुनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (लिंबेवाडी, रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन विजय डोंगरे (गुलाब कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली), प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण, रोहित अंकुश मंडले (दोघे रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), ऋतिक बुद्ध माने (कोकळे, ता. कवठेमहांकाळ), विक्रम तमान्ना घागरे (ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), प्रविण अशोक बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), अक्षय बाळासो शेंडगे (रा. कलानगर, सांगली), अवधुत सुनील पानबुडे (रा. नळभाग सांगली) या अकरा जणांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती.
या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे असल्यामुळे त्याच्यावर मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी विशेष पोलिस निरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे पाठवला होता. या टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर हा तपास उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जाधव यांनी पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेतला आहे. कसून चौकशी करण्यात आली. त्यात मुल्ला याचा मामेभाऊ मुनीर मुल्ला याचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान सचिन डोंगरेसह अन्य संशयितांशी मुनीर मुल्ला हा मोबाईलवरून संपर्क साधत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. नालसाबशी पूर्वी असलेल्या वादातून त्याने हल्लेखोरांशी संपर्क साधला असावा असा संशय पोलिसांना आहे. मात्र या खुनात त्याच्या सहभागाबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.