Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली सिव्हीलमधील उपस्थितीवरून अधिष्ठाता धारेवर! हिवाळी अधिवेशनात सांगली सिव्हिलला निधी : ना. मुश्रीफ

सांगली सिव्हीलमधील उपस्थितीवरून अधिष्ठाता धारेवर!
हिवाळी अधिवेशनात सांगली सिव्हिलला निधी : ना. मुश्रीफ



सांगली : खरा पंचनामा

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नियमित येत नाहीत, अशी तक्रार आमदारांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. हे ऐकताच वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी त्यांची कानउघाडणी केली. ‘तुम्ही सकाळी मिरजेत आणि दुपारी सांगलीत थांबा,’ अशा सूचना दिल्या. त्याकडे लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. ‘डॉक्टरांचे वेळापत्रक जाहीर करा,’ असेही सांगितले. यावेळी सांगली सिव्हीलमधील औषध पुरवठा, लॅब तपासण्यासह यासह अन्य विषयांवर ना. मुश्रीफ यांनी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांना धारेवर धरले. 

ना. मुश्रीफ यांनी सोमवारी सांगली सिव्हील हॅस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या. येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेले ५०० खाटांचे रुग्णालय, निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अद्ययावत शवागारासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद केली जाईल,’’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘शासकीय रुग्णालयावर ताण आहे. मंजूर कामांसाठी तरतूद करून लवकर सुरू करू. स्थानिक प्रशासनाकडे औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. शंभर टक्के औषधांचा पुरवठा सुरू आहे. एकही चिठ्ठी बाहेर दिली जाणार नाही. सर्व तपासण्याही येथे केल्या जातील. ‘सिव्हिल’च्या इमारतीचे तातडीने फायर ऑडिट करून घेतले जाईल.’’

कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी, ‘महाविकास आघाडी काळात मंजूर कामांसाठी हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद केलीच पाहिजे,’ अशी भूमिका मांडली. ‘सीटी स्कॅन यंत्रणा मंजूर झाल्याचे दोन वर्षे ऐकतोय, कधी सुरू होणार,’ असा सवाल केला. त्यावर श्री. मुश्रीफ यांनी तातडीने मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. रवींद्र खराडे यांनी इलेक्ट्रिकल ऑडिटचा मुद्दा मांडला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी याबाबत श्री. मुश्रीफ यांना प्रश्‍न उपस्थित केला. त्या वेळी, ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचे काम पहिले केले जाईल,’ असे सांगितल्याने हशा पिकला.

काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, ‘येत्या हिवाळी अधिवेशनात सिव्हिलसाठी आर्थिक तरतूद करा, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसावे लागेल,’ असा इशारा दिला. श्री. मुश्रीफ यांनी त्याची गंभीर दखल घेतली. ‘पृथ्वीराज, तुमच्यावर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. आर्थिक तरतूद वेळेत केली जाईल,’ अशी ग्वाही दिली. रुग्णांना बाहेरून औषधे व विविध चाचण्या करायला सांगितले जात असल्याची तक्रार अभिजित भोसले, आशिष कोरी यांनी केली.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक अभिजित भोसले, रवींद्र खराडे, आशिष कोरी, मनोज भिसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, सुरेश दुधगावकर यांनी ‘सिव्हिल’मधील अडचणींचा पाढा वाचला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.