गर्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक
३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग (सोनसाखळी लांबवणाऱ्या) करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेले दागिने, रोकड असा ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
विशाल राजू तुपे (वय २९, रा. पानवण, जि. सातारा), युसूफ महमद शेख (वय ४८, रा. मिडसावंगी, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विटा येथे दि. ६ सप्टेंबर रोजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची रॅली निघाली होती. त्यावेळी रॅलीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी किशोर डोंबे यांची सोन्याची चेन लंपास केली होती. याबाबत त्यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक श्री. डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
पथकाने या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करत संशयितांची नावे निष्पन्न केली होती. त्यानंतर पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन सोन्याच्या चेन आणि रोकड सापडली. ती जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली.
विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, गणपत गावडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.