गुंतवणूकीवर जादा परताव्याच्या अमिषाने ३६ लाखांना गंडा
सांगली : खरा पंचनामा
दहा महिन्यात गुंतवणुकीच्या दीडपट परतावा देण्याचे अमीष दाखवून शहरातील पाच जणांना दोघांनी तब्बल ३६ लाख ६८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मुंबई आणि सांगलीतील दोघांविरोधत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव पांडुरंग जाधव (रा. वरळी नाका, वरळी, मुंबई) आणि अरबाज जमीर सनदी (रा. घाटगे हॉस्पीटलजवळ, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अण्णासाहेब बाळासाहेब जगताप ( रा. झुरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि.८ मार्च २०२३ रोजी घनश्यामनगरमधील वरद अपार्टमेंटमध्ये घडला.
संशयीतांनी फिर्यादी जगताप यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रेहान इंटरप्राईजेस आणि अतुल्य मायक्रो फायनान्स मध्ये गुंतवणुक केल्यास दहा महिन्यात गुंतवणुकीच्या दीडपट परतावा देण्याचे अमीष दाखविले. त्यांच्या अमिषाला बळी पडून जगताप यांनी सुरुवातील १७ लाख रुपयांची गुंतवणुक केली. हे करताना त्यांनी लेखी करार केला होता. त्याचबरोबर संशयीतांनी पुढील तारखांचे धनादेशही दिले होते. सुरुवातीला संशयीतांनी जगताप यांना २ लाख ९० हजाराचा परतावा दिला. परंतु उर्वरित रक्कम आणि त्यावरील परतावा देण्यास टाळाटाळ करत संशयीतांनी आपल्या कार्यालयाला कुुलुप लावून पलायन केले.
आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच जगताप यांनी संशयीतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्याप्रमाणे आणखी काही जणांची संशयीतांनी फसवणुक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशोक नारायण पाटील यांची ५ लाख ४० हजारांची, विलास सुखदेव शिंदे यांची १३ लाख रुपये, शुभांगी मनोजकुमार पाटील यांची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणुक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयीताचा शोध सुरु केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.