Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोफत औषधे पुरवा, रूग्णांची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन! कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक मासाळेंनी सिव्हील प्रशासनाला धरले धारेवर

मोफत औषधे पुरवा, रूग्णांची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन!
कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक मासाळेंनी सिव्हील प्रशासनाला धरले धारेवर



सांगली : खरा पंचनामा



सांगलीच्या शासकीय रूग्णालयात (सिव्हील) दाखल रूग्णांना मोफत औषधे का पुरवली जात नाहीत, गंभीर रूग्णांची दखल घेतली जात नाही. रूग्णांच्या नातेवाईकांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. आवश्यक औषधे तातडीने खरेदी करा, बाहेरच्या दुकानातील औषधांच्या चिठ्ठ्या देऊ नका, खासगी लॅबमध्ये रक्त, लघवी तपासणीसाठी पाठवू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक मासाळे यांच्या शिष्टमंडळाने दिला. यावेळी शिष्टमंडळाने सिव्हील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

सांगलीतील सिव्हीलमधील भोंगळ कारभाराचा श्री. मासाळे यांनी शुक्रवारी चांगलाच पंचनामा केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास देवकारे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मासाळे यांनी रूग्णालयाचे अधीष्ठाता किती वाजता सांगलीत येतात, किती वाजता जातात यावरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सामान्य रूग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याने अधिष्ठाता यांना तातडीने बोलावून घ्या असे सांगितले.  

अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आल्यानंतर मासाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुन्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी नांदेडसारखी घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला. आपत्कालीने सेवेच्या ठिकाणी असलेले डॉक्टर रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी तुसडेपणाने वागतात असा आरोपही मासाळे यांनी यावेळी केला. यावेळी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी रूग्णालयाने शासनाकडून अडीच कोटींची औषधे मागवल्याची माहिती दिली. सिव्हीलच्या फायर ऑडिटबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर ऑडिट झाले आहे मात्र त्याचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी येत्या दहा दिवसांत सिव्हीलमध्ये सर्व सुविधा मिळतील तसेच बंद असलेली सर्व मशीन सुरू करू असे आश्वासन डॉ. नणंदकर यांनी दिले. 

सांगलीच्या सिव्हीलमधील सर्व त्रुटींची पूर्तता तातडीने न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शिवाय अधिष्ठाता हटाव सिव्हील बचाव अशा घोषणाही देण्यात आल्या. सिव्हीलमधील भोंगळ कारभाराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्याचे यावेळी मासाळे यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळातर्फे अधिष्ठातांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी बाजीराव गस्ते, सचिन आरवडे, मराठा महासंघाचे प्रवक्ते संतोष पाटील, अक्षय मासाळे, मुपीत कोळेकर, खोदबुद्दीन मुजावर, किशोर सूयर्वंशी, सुरेश कांबळे, प्रशांत रणधीर, सचिन काटकर, चंद्रकांत पाटील, प्रेम चौधरी, आशिष चौधरी आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.