दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, ३ दुचाकी जप्त
सांगली, कोल्हापुरीतील गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली, कोल्हापुरातील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
शाहीद हुसेन आसंगी (वय २२, रा. संभाजी कॉलनी, सांगली), अनिल शिवाजी खिलारे (वय ३३, रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दुचाकी चोरीतील संशयितांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना शाहीद आसंगी, अनिल खिलारे यांनी दुचाकी चोरल्या असून त्याची ते विक्री करणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. तसेच चोरीच्या दुचाकी संभाजी कॉलनी येथे असल्याचीही माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने संभाजी कॉलनी येथे छापा टाकला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दोन दुचाकी कुपवाड येथून तर एक दुचाकी गोकुळ शिरगाव येथून चोरल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करून चोरीच्या तीनही दुचाकी पथकाने जप्त केल्या. त्यांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, मच्छिंद्र बर्डे, बिरोबा नरळे, विक्रम खोत, सागर लवटे, उदय माळी, सोमनाथ पतंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.