स्वाभिमानीचे कोल्हापूरसह राज्यात चक्काजाम आंदोलन
कोल्हापूर : खरा पंचनामा
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाला चारशे रुपये द्या तसेच यंदाच्या उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी या मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित आहे. कोल्हापुरातून हातकणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उसाच एक कांडक देखील कारखान्याला जाऊ देणार नाही. तसेच हे पैसे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या १३ सप्टेंबरपासून ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. मात्र याची दखल साखर कारखानदारांनी न घेतल्यानं ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. यावेळी ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र या बैठका देखील निष्फळ ठरल्या यामुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक तसेच ऊस तोडणी बंद पाडण्यात आली. यामुळं या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे. तर सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.