'वाचाळवीरांची संख्या वाढलीय'
अजित पवारांचा रोख कोणाकडे?
कराड : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त कराड येथे स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान अजित पवारांनी मराठा आरक्षण तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, आज यशवंतराव चव्हाणांची ३९वी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सुसंवाद आणि एकोपा निर्माण करून समाजकारण, राजकारण कसं करावं याची मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाण यांनी रोवली. मात्र अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढल्याचे आपण बघतो, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. पण रोज कोणीतरी काहीतरी विधान करतं. कुणी आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं हे यशवंतराव चव्हाण यांनी शिकवलं नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असेही अजित पवार म्हणाले. मला कोणाला टोकायचं नाहीये, माझ्यासकट सगळ्यांनी आत्मचिंतन करावं असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सरकारच्या भूमिकेविरोधात जात छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली आहे. यावरून विरोधकांकडून देखील राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे विधान केलं आहे.
आज अनेक समाज पुढे आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शपथ घेऊन आरक्षण देणारच असं सांगितलं. तसा प्रयत्न सरकारचा चालू आहे. त्यासाठी त्यांनी काही समित्या नेमल्या आहेत. मागास आयोगाचं काम सुरू आहे. धनगर समाजाची मागणी आहे, धनगर समाजाच्या मागणीबद्दल आदिवासी समाजाची वेगळी भूमिका आहे. यामध्ये ओबीसी समाजाची वेगळी भूमिका आहे. शेवटी प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. फक्त तो वापराताना कटूता येऊ नये ही काळजी सर्वानीच घ्यावी अशी माझी विनंती आहे असे अजित पवार म्हणाले.
सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या सगळ्यांनी कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. मागणी करताना ती नियमात बसवण्यासाठी लागेल तो वेळ द्यावा लागेल नाहीतर ते कोर्टात टिकत नाही. बिहार सरकारने काही वेगळे निर्णय घेतले आहेत, आमच्यात पण तसं काही करता येईल का अशी चर्चा सुरू आहे. राज्यात ६२ टक्के आरक्षण दिलं आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण देत असताना इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं ठरवलं आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.