Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरे फोडणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक, दहा गुन्हे उघड पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

घरे फोडणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक, दहा गुन्हे उघड
पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील घरे फोडणाऱ्या आतंरराज्य चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सांगली जिल्ह्यातील दहा गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे पावणेसात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात यश आल्याची  माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

यल्लाप्पा ऊर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२, रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.  जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. 

पथकाला रेकॉर्डवरील चोरटा यल्लाप्पा शिंदे हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरजेतील सिव्हील चौक परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्या परिसरात सापळा रचला. काही वेळानंतर सिव्हीलजवळील बसवेश्वर उद्यान परिसरात एकजण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरज तालुक्यातील सुभाषनगर, मालगाव, एरंडोली, कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड, जत तालुक्यातील डफळापूर, कंठी, वायफळ, बनाळी या गावांमध्ये दिवसा आणि रात्री घरफोड्या करून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय कांबळे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, अमर नरळे, संदीप गुरव, बाबासाहेब माने, शुभांगी मुळीक, प्रकाश पाटील, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.