Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक दोन लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त; सांगली शहर पोलिसांची कारवाई

कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक
दोन लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त; सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरात दुचाकी चोरणारे, कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी करणारे तसेच घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांना सहकार्य करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी, कोयता, रोकड, सत्तूर असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

सोहेल राजेसाब गलगले (वय २४, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली), विशाल बाबुराव रणदिवे (वय १९, रा. चिन्मय पार्क, यशवंतनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक श्री. देशमुख यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांवर वॉच ठेवून त्यांना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पथक शनिवारी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी जुना बुधगाव रस्ता परिसरात काहीजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात जाऊन तेथे सापळा रचला. त्यावेळी चौघेजण तीन दुचाकीवरून तेथे आले. पथकातील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने थरारक पाठलाग करून चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विश्रामबाग, संजयनगर तसेच सांगली शहरातून त्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कोयता, रॉड, सत्तूर, रोकड अशा वस्तू सापडल्या. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, संदीप कुंभार, योगेश सटाले, गौतम कांबळे, सुमित सूर्यवंशी, संतोष गळवे  आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.