धक्कादायक! पोलिसानेच खेचली महिला तहसीलदाराची चेन
नाशिक : खरा पंचनामा
लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या एका पोलीस शिपायाने त्र्यंबकेशवरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मानेला हिसका देत, दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता.
याबाबत सरकारवाडा व गुन्हे शाखेची पथके संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मागावर होती. त्याच्या साथीदाराने त्याची माहिती पोलिसांना दिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. योगेश शंकर लोंढे असे अटक केलेल्या संशयित पोलीस शिपायाचे नाव आहे.
तहसीलदार श्वेता संचेती या जेजुरकर कॉलनीच्या जवळील रस्त्याने किराणा माल खरेदी करुन पायी जात होत्या. त्यांच्यावर पाळत ठेवून दुचाकी घेऊन उभे असलेल्या दोघांपैकी एकाने संचेती यांची सोनसाखळी ओढली. ही घटना रविवारी (दि.12) लक्ष्मीपुजनाच्या संध्याकाळी घडली. सोनसाखळी चोराने पुढे पळत जाऊन दुचाकीवर बसून धूम ठोकली होती. एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने लोंढे याने सोनसाखळी चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी श्वेता संचेती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संशियत आरोपीचा शोध घेत असताना लोंढे हा अंबड भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अंबड भागात सापळा रचून लोंढे याला शिताफीने ताब्यात घेतले. तत्पूर्वी लोंढे व त्याच्या अल्पवयीन साथीदारामध्ये वाद झाले होते. हा वाद चांगलाच वाढला आणि अल्पवयीन साथीदाराने घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती सरकारवाडा पोलिसांना कळवली. यामुळे पोलीस लोंढेच्या मागावर होते. चौकशीमध्ये तो पोलीस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले.
संशयित लोंढे याला 2012 मध्ये 15 हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोंढे यांची खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो जनरल ड्युटी करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.