आष्ट्यातील खूनप्रकरणी दोघांना अटक
दारू न दिल्याने कृत्य, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील आष्टा येथे दारू न दिल्याच्या रागातून सोमवारी रात्री वैभव घस्ते या तरूणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आष्ट्यातील दोन तरूणांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अंकित नरेश राठोड (वय २१, रा. गांधीनगर, आष्टा), प्रतीक भरत जगताप (वय २०, सध्या रा. आष्टा, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित राठोड आणि जगताप यांनी मृत वैभव याच्याकडे दारू मागितली. त्याने नकार दिल्यानंतर चाकून भोसकून त्याचा खून करण्यात आला होता. घटनेनंतर संशयित पळून गेले होते यातील संशयितांना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
पथक संशयितांची माहिती घेत असताना अंकित राठोड, प्रतीक जगताप यांनी हा खून केला असून ते दुचाकीवरून आष्टा-सांगली रस्त्यावरून निघाल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर लक्ष्मी फाटा येथे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दारू न दिल्याने वैभव घस्ते याचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दोघांनाही आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अरूण पाटील, कुबेर खोत, सूरज थोरात, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.