Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत ८ हजारांची लाच घेताना महापालिकेच्या मुकादमास अटक सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मिरजेत ८ हजारांची लाच घेताना महापालिकेच्या मुकादमास अटक
सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

चार महिन्यांची हजेरी लावून त्याचे मानधन काढल्याच्या मोबदल्यात ८ हजारांची लाच घेताना महापालिकेच्या मुकादमाला अटक करण्यात आली. मिरजेत मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८) असे अटक केलेल्या मुकादमाचे नाव आहे. तक्रारदार प्रभाग क्र. २० मध्ये काम करतो. त्याची चार महिन्यांची हजेरी लावून त्या चार महिन्याचे मानधन प्रभारी मुकादम जबडे याने काढले होते. त्याच्याबदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार याप्रमाणे १२ हजार रूपयांची लाचेची मागणी जबडे याने तक्रारदाराकडे केली होती. मात्र तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्याने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.  

त्या तक्रारीनुसार त्याची पडताळणी केल्यानंतर जबडे याने ८ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ एका चहाच्या टपरीजवळ सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी मुकादम जबडे याला तक्रारदाराकडून ८ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांकडून लाचेची मागणी झाल्यास 9821880737 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. 

पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सीमा माने, वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.