इटकरे येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा, ८ जणांना अटक
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इटकरे (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून ८ जणांना अटक करण्यात आली. यावेळी साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
रोहित अरविंद भोसले (वय ३०, रा. इटकरे), अविनाश हणमंत नरळे (वय २९, रा. कुरळप), सूरज हणमंत साखरे (वय ३२, रा. इटकरे), संदीप चंद्रकांत पाटील (वय ३५, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शुभम अशोक सूर्यवंशी (वय २६, रा. इटकरे), अभिषेक निवृत्ती सकटे (वय २३, रा. इटकरे), अवधूत प्रकाश दळवी (वय ३२, रा. गंजीगल्ली, कोल्हापूर), विशाल अशोक गिरीगोसावी (वय ३०, रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले आहे. शुक्रवारी हे पथक जिल्ह्यात गस्त घालत असताना इटकरे फाट्याजवळील एका हॉटेलच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी पैसे लावून जुगार खेळणाऱ्या आठजणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अरूण पाटील, विनायक सुतार, सुनील जाधव, रोहन घस्ते, सूरज थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.