सांगलीतील खूनप्रकरणी तिघांना अटक
पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंधातुन कृत्याची कबुली, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गोकुळनगर येथे विनोद इंगळे याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विनोद याच्याशी असलेले पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधांच्या कारणावरून त्याचा खून केल्याची कबुली तिघांनीही दिल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
कृष्णा ऊर्फ मुदक्या कुटण्णाप्पा कांबळे (वय २१, रा. दसरा चौक, सांगली), राकेश शामराव कांबळे (वय २६, रा. न्यू टिंबर एरिया, सांगली), नारायण सुरेश पवार (वय २१, रा. माकडवाले गल्ली, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान विनोद गोकुळनगर येथील रिक्षा स्टॉपवर थांबला होता. त्यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले होते. घटना घडल्यानंतर निरीक्षक श्री. शिंदे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे विशेष पथक तयार केले होते.
संशयितांचा शोध घेत असताना संशयित तात्यासाहेब मळा परिसरात लपले असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विनोद याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग होता तसेच अनैतिक संबंधावरूनही त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तिघांनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अमर नरळे, विक्रम खोत, संदीप नलवडे, उदय माळी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.