चुलतीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या पुतण्याला अटक
सव्वादोन लाखांचे दागिने जप्त, सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे दिवाळीसाठी आलेल्या चुलतीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या पुतण्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सव्वादोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.
अश्वजित जितेंद्र कवठेकर (वय २२, रा. अभयनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्योती कवठेकर या अश्वजितच्या चुलती आहेत. सध्या त्या कुटुंबासमवेत चिपळूण येथे राहतात. दिवाळीसाठी त्या कवठेपिरान येथे आल्या होत्या. बुधवार दि. १५ रोजी त्यांनी घरातील कपाटात त्यांचे दागिने ठेवले होते. त्यादिवशी सायंकाळी दागिने तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली मात्र दागिने सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर निरीक्षक गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथकातील संतोष माने यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ज्योती यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. त्यानंतर अश्वजित त्या दिवशी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याचा नेकलेस, चेन, बांगड्या असा सव्वादोन लाखांचे दागिने जप्त केले. त्याला अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष माने, मेघराज रूपनर, सुशील मस्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास संतोष माने करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.