राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी; निकालाकडे राज्याचं लक्ष
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात गुरुवारी (ता. ९) सुनावणी होत आहे. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता.
तर, सुनावणी लवकर संपविण्यासाठी घाई करीत असल्याबद्दल आयोगाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले होते. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत; तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत.
अजित पवार गटाने 'राष्ट्रवादी'वर आपला हक्क सांगताना पी. ए. संगमा, सादिक अली या दोन प्रकरणांसह शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचा हवाला दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना ( शिंदे गट) आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. आज याच प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.