Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुंड म्हमद्या नदाफचा कर्नाटकात धुमाकूळ! किरकोळ कारणावरून उगारले पिस्तूल, म्हमद्यासह तिघांना अटक

गुंड म्हमद्या नदाफचा कर्नाटकात धुमाकूळ!
किरकोळ कारणावरून उगारले पिस्तूल, म्हमद्यासह तिघांना अटक



जमखंडी : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील नामचीन गुंड महमद ऊर्फ म्हमद्या जमाल नदाफ याने कर्नाटक राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कारला कट मारला म्हणून त्याने बनहट्टी परिसरात एकावर पिस्तूल उगारले. याप्रकरणी म्हमद्यासह तिघांना बनहट्टी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल आठ वर्षानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर म्हमद्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. 


याप्रकरणी म्हमद्यासह गजानन प्रकाश गवळी (रा. कुपवाड), समर्थ कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत) यांना बनहट्टी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे, एक धारदार चाकू, एक कार (एमएच १० डीव्ही ७७८६) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांवरही खुनाचा प्रयत्न, आर्म एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हमद्या नदाफ कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याची अट न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातली होती. त्यानंतर दिवाळीत सांगली पोलिसांनी त्याला गोवा येथे सोडले होते. 


म्हमद्या सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म एक्ट, मारामारी, गर्दी मारामारी, शरीराविरूद्धचे गुन्हे, मालमत्तेविरूद्धचे गुन्हे असे तब्बल २२ गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही गुन्ह्यातून त्याची मुक्तताही करण्यात आली आहे. २०१५ मध्ये अभयनगर येथे त्याचाच साथीदार असलेल्या विजय माने याचा त्याने खून केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हमद्याला बेडकिहाळ येथे सांगली पोलिसांनी अटक केली होती. या खुनाच्या घटनेनंतर त्याच्यासह तब्बल १३ ते १४ जणांविरोधात मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 

त्यानंतर म्हमद्याची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दोन वर्षापूर्वी त्याच्यावर येरवडा कारागृहात जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामध्ये गंभीर जखमी होऊनही तो वाचला होता. एक महिन्यापूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयाने त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र दि. ९ डिसेंबर रोजी त्याने गाडीला कट मारल्याच्या कारणावरून एकावर पिस्तूल रोखल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 

म्हमद्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.