महिलेस अडवून लुटणाऱ्या तिघांना अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी-अग्रण धुळगाव रस्त्यावर मोपेडवरून निघालेल्या महिलेला अडवून चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अक्षय श्रीकांत पाटोळे (वय २४, रा. डफळापूर, ता. जत), अमोल बाबासाहेब रूपनर (वय २२, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ), किसन लक्ष्मण नरळे (वय २२, रा. घोरपडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात कोगनोळी येथील दीपाली मगर या महिलेला दि. १० आक्टोबर रोजी सकाळी मोपेडवरून जाताना अडवून तिला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते. या पथकाला शस्त्राच्या धाकाने लुटमार करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील लुटलेले सोने विक्री करण्यासाठी मिरजेतील बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. बसस्थानकाच्या पिछाडीस तिघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती त्यांच्याकडे सोन्याचे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोगनोळी-अग्रण धुळगाव रस्त्यावर महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील सव्वा लाख रूपये किमतीचे सोने जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. तिघांनाही कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, दीपक गायकवाड, आमसिद्ध खोत, अरूण पाटील, अमर नरळे, प्रकाश पाटील, अभिजित ठाणेकर, सुशांत चिले, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.