स्वातंत्र्यप्राप्तीत शीख समाजाचे अनन्यसाधारण योगदान
आमदार सुधीर गाडगीळ यांचे मत; गुरुव्दारात साहिबजादे जोरावर, बाबा फतेहसिंहांना अभिवादन
सांगली : खरा पंचनामा
देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. गुरु गोविंदसिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांचे मात्र बलिदान अनन्यसाधारण होते. त्यांच्या हौतात्म्याचा आदर्श ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. इतिहासाला गौरवास्पद वाटावे, अशा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान प्रत्येकाने करावा, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
सांगली टिंबर एरिया येथील गुरुव्दारात गुरु गोविंदसिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेहसिंह यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांच्या स्मृतीला अभिवादन केले. आमदार गाडगीळ म्हणाले, हिंदुस्थानची ओळख सांगणाऱ्या या दिनानिमित्त देशाच्या रक्षणार्थ बलिदान दिलेल्या शीख समाजाच्या दहा गुरुंचे योगदान न विसरण्याजोगे आहे. गुरु गोविंदसिंगजी यांची ‘देश सर्वप्रथम’ ही प्रेरणादायी संकल्पना आजही गरजेची आहे. वैभवशाली परंपरा असणाऱ्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे. देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काही नीतीमुल्ये जपणे आवश्यक आहे. त्यासाठी हा दिन गुरुग्रंथसाहिबमधील विश्वबंधुता व सर्वसमावेशकता टिकवण्यासाठी प्रेरणादायी आहे.
गुरुद्वारा आश्रमचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग यांनी वीर बाल दिनानिमित्त शहीद झालेल्या बालवीरांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी दातार सिंग, जसविंदर सिंग, परमजीत सिंग, हरपाल सिंग, बलजींद्र सिंग, मंजीत सिंग, संजय सिंग, भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, माजी नगरसेविका अनारकली कुरणे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, महिला मोर्चा सरचिटणीस गीता पवार, भाजप कोषाध्यक्ष धनेश कातगडे, रवींद्र ढगे, प्रियानंद कांबळे, अर्जुन मजले, चेतन भोसले यांच्यासह पदाधिकारी व शीख समाजातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.