चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक
सोन्याची चेन जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत चाकूच्या धाकाने पैसे, दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक संशयित पसार झाला आहे. चोरट्यांकडून ६५ हजारांची सोन्याची चेन जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
विकी राजू मुळके (वय २५, रा. माकडवाले गल्ली, सांगली), गणेश हणमंत पवार (वय २०, रा. कुलकर्णी प्लॉट, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विष्णू मुळके हा पसार झाला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढल्याने निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांना तातडीने पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
सोमवारी पथकाला दोघेजण चोरीचे सोने विक्री करण्यासाठी शिलंगण चौक परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. संशयित मुळके आणि पवार तेथे आल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ सोन्याची चेन सापडली. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विष्णू मुळके याच्यासोबत नोव्हेंबरमध्ये आपटा पोलिस चौक परिसरात एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड आणि चेन काढून घेतल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली.
सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संकेत कानडे, गजानन चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.