Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हिंमत असल्यास मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

हिंमत असल्यास मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे



मुंबई : खरा पंचनामा

नुकत्याच झालेल्या पाच पैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात असून महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यानंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले. त्यामुळे आता त्यांना माझं आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले. तसेच सरकारला आणि अदाणींना मला विचारायचं आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत, त्याठिकाणी धारावी वासीयांना राहायला घर मिळायला हवे. त्यामुळे जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबरला धारावीहून अदाणींच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

पुढे ते म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो का? कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीच्या नावाने मतं मागितली. तर मध्यप्रदेशात अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लांचं फुकट दर्शन घडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिले नाही, असेही ठाकरेंनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.