आरेवाडीतील अभिजित कोळेकर टोळी दोन जिल्ह्यांतून हद्दपार
पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडित काढून या टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली एक्शन मोडवर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील अभिजित कोळेकर टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वषार्साठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश डॉ. तेली यांनी गुरुवारी दिले आहेत.
अभिजित आत्माराम कोळेकर (वय २३), समाधान धोंडिबा गडदे (वय २२, दोघेही रा. आरेवाडी) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या टोळीविरोधात २०२० ते २०२२ या दोन वर्षाच्या काळात घातक शस्त्राच्या धाकाने खंडणी मागणे, दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे तसेच या टोळीविरोधात शरिराविरूद्धचे तसेच मालमत्तेविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही टोळी कायदा जुमानत नव्हती. त्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांनी या टोळीविरोधात हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव अधीक्षक डॉ. तेली यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जतचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्याकडे हा प्रस्ताव चौकशीसाठी पाठवला होता. त्यांनी चौकशी करून अधीक्षकांकडे अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार अधीक्षक डॉ. तेली यांनी या टोळीला सांगली, सोलापूर या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्यांचा बिमोड करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक ज्योतिराम पाटील, श्रेणी उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, मनीषा बजबळे यांनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.