Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फ्लॅटमधून दागिने, रोकड चोरणाऱ्या महिलेस अटक सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, राजारामपुरी पोलिसांची कारवाई

फ्लॅटमधून दागिने, रोकड चोरणाऱ्या महिलेस अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

शहरातील राजारामपुरी येथील नवव्या गल्लीतील सागर अपार्टमेंट येथील एका फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली. तिच्याकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

निकिता सचिन जाधव (वय २८, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. जयवंती पिसाळ यांचा सागर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. दि. ८ डिसेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. जाताना त्यांनी कुलुपाची चावी शेजाऱ्यांकडे दिली होती. दि. ९ रोजी पिसाळ परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर निरीक्षक तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर एका महिलेने शेजाऱ्यांची नजर चुकवून पिसाळ यांच्या घराची चावी मिळवून त्यांच्या घरात चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून सव्वा लाखांचे दागिने, रोकड जप्त करण्यात आली आहे.  

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ, उपनिरीक्षक युवराज जाधव, समीर शेख, विराज डांगे, सारिका गौतम, युक्ती ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.