15 लाख रुपये स्वीकारताना पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; पोलीस निरीक्षक फरार
ठाणे : खरा पंचनामा
गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व अटक न करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने 50 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 15 लाख रुपये लाच स्वीकारताना भाईदर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तर पोलीस निरीक्षक पसार झाले आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.17) करण्यात आली. एसीबीच्या या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार असे फरार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर पोलीस हवालदार गणेश वणवे असे 15 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार व त्यांचे अशिल यांना गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 35 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली.
ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 लाख रुपये मागणी करुन तडजोडी अंती 35 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ठरलेल्या रक्कमेपैकी 15 लाखांचा पहिला हप्ता पोलीस हवालदार गणेश वणवे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 15 लाख रुपये स्वीकारताना गणेश वणवे याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, एसीबीने कारवाई केल्याचे समजताच पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाले आहेत.
एसीबीच्या पथकाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार व पोलीस हवालदार गणेश वणवे यांच्यावर मिरा रोड पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून गणेश वणवे याला अटक केली आहे. तर फरार पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.