बनावट विदेशी स्क्वॉचच्या कारखान्यावर छापा
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
पुणे : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट विदेशी स्क्वॉच तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कात्रज परिसरातील देहूरोड बायपास, आंबेगाव बु. येथे हा कारखाना सुरू होता. याप्रकरणी महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड बायपास रोड स. नं. 3, आंबेगाव बुद्रुक येथे बनावट विदेशी स्क्वॉच बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने आंबेगाव बु. येथील कारखान्यावर दारूबंदी गुन्ह्यांतर्गत छापा टाकला. या ठिकाणावरून बनावट विदेशी स्क्वॉचच्या 34 सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, 551 रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बूच, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लास्टिक पॅकिंग रोल, प्लास्टिक चिकटपट्टी आणि मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 39 हजार 747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारखान्यात विदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यात पुन्हा मद्य भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरांमध्ये पाठविले जात होते. तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या महेशभाई कोळी याने पथकाला दिली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन. एन. मारकड, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस. एस. इंदलकर, जवान व वाहनचालक जवान शरद भोर, गोपाल कानडे व महिला जवान उज्ज्वला भाबड यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.