निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर पोलिसांना शरण
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी गुह्यात होते फरार
जळगाव : खरा पंचनामा
स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. मात्र आज सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात ते स्वताहून हजर झाले.
किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून वादंग निर्माण झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयासह हायकोर्ट येथे अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता.
अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.