कर्नाटकातील व्यक्तीला लुटणाऱ्या चौघांना सांगलीत अटक
विश्रामबाग पोलिसांची बारा तासाच्या आत कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील रेल्वे स्टेशनकडे निघालेल्या जाणाऱ्या कर्नाटकातील व्यक्तीला लिफ्टच्या बहाण्याने थांबवून त्याच्याकडील मोबाईलसह घड्याळ, रोकड लुटणाऱ्या चौघांना बारा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
बाळू विठ्ठल वाले (वय ३१, रा. लक्ष्मी मंदीरजवळ, सांगली), चेतन रामचंद्र पोळ (वय २९, रा. डी मार्ट मागे, सांगली), प्रथमेश प्रमोद मोहिते (वय २४, रा. स्फुर्ती चौक, सांगली), अक्षय नामदेव घुणके (वय २४, रा. किसान चौक, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अरूणगौड सागणगौड तोतड (वय २३, रा. तोटादेवड, जि. धारवाड, कनार्टक) यांनी फिर्याद दिली आहे.
तोत़ड शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनकडे चालत निघाले होते. त्यावेळी चौघे संशयित दोन दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी तोतड यांना लिफ्ट देतो असे सांगत त्यांच्याशी जवळीक साधली. नंतर त्यांच्याकडे संशयितांना दारू आणि सिगरेटची मागणी केली. तोतड यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर संशयितांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्यांच्याकडील मोबाईल, घड्याळ तसेच तीन हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. नंतर संशयित तेथून निघून गेले. त्यानंतर तोतड यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली.
या घटनेची माहिती मिळताच निरीक्षक मोरे यांनी रात्र गस्तीवरील पोलिसांना संशयितांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड परिसरातून संशयितांना शोधून काढले आणि त्यांना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकारी अधिकारी, अंमलदारांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.