सांगलीत एकावर खुनीहल्ला
चाकूने केले सपासप वार; चौघांना अटक
सांगली : खरा पंचनामा
शहरातील संजयनगर येथे पूर्वीच्या वादातून चौघांनी एकावर खुनीहल्ला केला. त्याच्यावर चाकूने भोसकून सपासप वार करण्यात आले. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अशोक ईश्वर म्हारुगडे (रा. संजयनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल सुखदेव खोत (वय २८), राहुल दिनकर पवार, रितेश सुरेश कांबळे आणि साहिल फारुख जामदार (वय २७ सर्व रा. संजयनगर) अशी संशयीतांची नावे आहेत. जखमी अशोक म्हारुगडे हा आपल्या कुटुंबियांसह संजयनगरमधील पाचोरे प्लॉट येथे राहतो. संशयित चौघांसोबत अशोक याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अशोक म्हारुगडे संजयनगरमधील एका स्टेशनरी दुकानाजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित राहुल खोत हा त्याच्या तीन मित्रांसोबत त्याठिकाणी आला. त्यांनी पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर राहुल खोत याने त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोक म्हारुगडे याच्या पोटात भोसकून, हातावर वार करून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर संशयित चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अशोक यास तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अशोकचा भाऊ आनंद म्हारुगडे याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.