चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
६.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
आटपाडी, खानापूर तालुक्यात चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्याच्याकडून ६.७५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याची आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
आण्णा दौलुशा पवार (वय १९, रा. सोमेश्वरनगर, आटपाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते. या पथकाला एक तरूण घरफोडीतील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने स्टेडियम परिसरात सापळा रचला. त्यावेळी स्टेडियमच्या दक्षिणेकडील गेटजवळ एक तरूण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला आढळले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आटपाडी, खानापूर तालुक्यात चोरी, घरफोडी करून तेथील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे ६.७५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अमोल लोहार, संकेत मगदूम, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, शुभांगी मुळीक, सोमनाथ गुंडे, उदय माळी, प्रकाश पाटील, अभिजित ठाणेकर, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.